पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'आशय सांस्कृतिक' आणि 'पु. ल. परिवार' यांच्या तर्फे आयोजित 'ग्लोबल पुलोत्सव' मध्ये नुकताच 'पु. ल. आजोबा' हा सर्वांगसुंदर प्रयोग सादर झाला. पुलंच्या साहित्यकृती आणि कलाकृतींवर आधारित हा संगीत - नृत्य - नाट्य - अभिवाचन आविष्कार 'प्रेरणा - एक कलामंच' या संस्थेच्या बाल - कुमार - युवा कलाकारांनी सादर केला. संकल्पना आणि दिग्दर्शन स्वाती उपाध्ये यांचे होते.
पुलंनी संगीत दिलेल्या 'नाच रे मोरा' या गीतावरील नृत्याने, ताल धरून सुरु झालेला हा कार्यक्रम, 'बालपणीचा काळ सुखाचा' या त्यांच्या लेखाच्या अभिवाचनाने पुढे जातो. त्यानंतर सादर झालेले 'वयं मोठ्ठम खोटं' हे बालनाट्य म्हणजे 'पु. ल. आजोबांनी' लहान मुलांना दिलेली चिरंतन भेटच आहे. त्याचा हा प्रयोग बघताना, ही मुले जणू त्यांच्या अंगा - खांद्यावर खेळत आहेत, मस्ती करत आहेत असे जाणवत होते.
'असा मी असा मी' आणि 'नारायण' मधल्या काही प्रसंगांचे सादरीकरण, खास पु. ल. शैलीत एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू आणत होते. त्याच बरोबरीने 'पुलंच्या' काही अश्या साहित्यकृतींचे सादरीकरण ह्या बालकुमार कलाकारांनी रंगमंचावर केले, ज्या सहसा सादर केल्या जात नाहीत. उपस्थित प्रेक्षकांसाठी ही 'पुलकित' भेटच प्रेरणाने दिली.
'पु. ल.' आणि संगीत हे अतूट नाते ह्या प्रयोगाच्या शेवटी उलगडतानाच त्यांच्या संगीतावर आधारित, सादर झालेले नृत्य 'प्रेक्षणीय' होते.
'पु. ल.' आणि 'सुनीताबाई' माणूस म्हणून किती संवेदनशील होते हे सांगून, त्यांच्या प्रसिद्धी - परान्मुख समाजकार्याचा उल्लेख करून, ह्या कलाकारांनी त्यांचे जणू 'विश्वरूप दर्शन' उपस्थितांना घडवले.
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
२५ नोव्हेंबर २०१८
'प्रेरणा'च्या ह्या देखण्या प्रयोगासाठी झटलेली ही रंगमंच्यामागील 'टीम प्रेरणा'! प्रत्येक प्रयोग नेटका व्हावा आणि प्रेक्षणीय व्हावा अशा उद्देशाने ही सर्व मंडळी कायम, तत्परतेने कलाकारांना वेळेवर तयार ठेवत असतात! आमच्या सगळ्या यशस्वी प्रयोगांमागचे हे उघड गुपित!
Smart City या विषयावरील एक अनोखा प्रयोग. Smart City साठी सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी मुलांपर्यंत आणि त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवणारा एक भव्य प्रयोग.